Monday, March 05, 2012

चित्रभाषा

१७/१८च्या वयात एकदा कुणाबरोबर तरी जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे गेले होते. तोपर्यंत माझा आणि चित्रकलेचा संबंध फक्त शाळेत इंटमिजियेट परिक्षेला बसण्यापुरताच. पण त्या दिवशी जेजेच्या आवारातली दाट, गर्द झाडी, जागोजागी लयबद्ध शिल्पं, उंच खिडक्यांच्या कमानी, नक्षीदार खांब आणि त्यांच्या तितक्याच नक्षीदार सावल्या मिरवणारे लांबलचक पॅसेज,आतमधे भव्य सिलिंगमधून सांडणारा प्रकाश, पेंटींग्जनी सजलेल्या, अनोखी फ़रशी असलेल्या त्या कलात्मक, दगडी इमारतीत एक खोलवर कलेचा श्वास हृदयातून पोटापर्यंत खेचून घेतला गेला आणि मग तो सावकाशपणे रक्तात भिनला तो कायमचाच. चित्रकलेच्या दुनियेच्या मोहमयी आकर्षणाची रुजवात जे जे स्कूल ऑफ़ आर्टच्या आवारात झाली आणि ती जोपासली गेली जहांगिर, पंडोल, एनजिएमए, एनसिपिएमधल्या चित्रदालनांमधल्या फ़े-यांमधून, अनेक दुपारी तासनतास ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीमधल्या त्या मऊ, गुबगुबीत चामडी खुर्च्यात बसून, मधल्या काचेच्या टेबलावर तिथली भलीमोठी पेंटिंग्जची, पेंटर्सच्या आयुष्यावरची पुस्तकं बघण्यात घालवल्या. एकेका चित्राचे पान पुन्हा पुन्हा उलगडून, नजर खिळवून पाहीले, इंटरनेटवरुन त्या चित्रांचा, चित्रकारांचा प्रवास जाणून घेण्यात नादिष्टपणे रात्री खर्च केल्या. त्या चित्रांचं गारुड अजब होतं. मग चिन्ह’च्या अंकांनी विशेषत: भास्कर कुलकर्णी आणि गायतोंडे विशेषांकांनी भारुन टाकलं, अंकांची पारायणं केली. चित्रकारांचे त्यातले किस्से, कहाण्या वाचल्या.
या सगळ्यातून आता मला चित्रकला इतकी कळली आहे कां की इथे मी त्यावर लिहावं असा एक प्रश्न स्वत:ला अनेकदा विचारुन झाला.
चित्रकला म्हणजे नक्की काय?
ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीमधे पावसाळी दुपारी बघीतलेली ती चित्रं.. मोने, माटिझ, सेझां, रेन्वाची आणि गॉघ, गोगॅं आणि पिकासोची.. ती एकातएक गुंतलेल्या कमळांची वर्तुळं आणि संथ, हिरवी तळी, गव्हाची शेतं आणि त्यावर हेलकावणारे कावळ्यांचे काळे, उदास थवे, शेकोटीचा तो गूढ, लाल प्रकाश (की अंधार?), नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या निळ्या-हिरव्या रात्रींच्या आवरणातून झिरपत राहीलेली पिवळी अस्वस्थ अशांतता,

ताहिती बेटावरच्या अनोख्या सूवर्णप्रकाशात झळाळून उठलेली सावळ्या कायेची आभा, तो पिवळा ख्रिस्त आणि त्याच्या भोवताली लीनतेनं बसलेल्या खेडूत स्त्रियांच्या चेह-यावरचे प्रार्थनाशिल, करुण भाव,गेर्निकेमधला वेदनेचा चित्कार.. अमृता शेरगिल, अंजोली इला मेनन,सूझा, रझा, गायतोंडे, बरवे आणि आरा, हुसेन आणि बावा आणि पटवर्धन.. काही जुन्या खिडक्यांच्या चौकटीतल्या उदास, दुख-या रंगछटा, रिकामे चेहरे, काही झळझळीत, गहिरे रंग आणि गोलाई असलेल्या भरीव पण तरल आकृत्या, काहींमधे नुसत्याच स्त्रिया,भयकारी, स्फ़ोटक, नग्न किंवा मायाळू, शांत, दैवी, काही तांत्रिक चौकोन आणि बिंदू, काही गूढ, अद्भूत आकार ज्यात पर्वत रडतात,झाडे हसतात, काही पैलू पाडलेल्या लोलकांसारखे रंगांचे तुकडे,काहींमधे फ़क्त प्रसन्न रंग-रेषा आणि कोणतेच प्रश्न न पाडवणा-या स्थिर फ़ुलदाण्या तर काही हिरव्या, निळ्याचा अथांग, खोल, आत खेचून घेणार अवकाश..
चित्रे समजून घेण्याचा प्रयत्न वगैरे सगळं फोल वाटलं जेव्हा गायतोंडेंचं वाक्य वाचलं- प्रेक्षक माझे चित्र उमजला तर ते उमजणे त्याचे स्वत:चे, माझे नव्हे. अंत:चक्षूंनी पाहिल्याशिवाय माझी चित्रं उमजणार नाहीत..."
मग उमजणं या शब्दाचा भुंगाच मागे लागला.
गॉघचा पिवळा रंग उधळलेला नाही, तो झिरपत रहातो, ठिबकत रहातो, मोनेच्या वॉटरलिलीज बघताना मनात दाटून येणारी प्रसन्नता आणि गॉघची आर्लेममधली खोली बघताना मनावर दाटून येणारी एकाकी उदासी यांची जातकुळी भिन्न, जरी पुन्हा पुन्हा पहाण्याचं अनावर आकर्षण तेच.. हा फ़रक कळणं म्हणजे चित्र उमजणं? कदाचित.
मोने म्हणतो- अनेकजणं माझ्या चित्रांवर चर्चा करतात, माझी चित्रं त्यांना कळाली आहेत असा दावा करतात, माझी चित्रं कळलीच पाहीजेत असा त्यांचा अट्टाहास का? माटिझ म्हणतो आधी आकार असतो आणि रेषा त्याभोवती सुरु होतात, क्लीचा प्रवास बिंदू पासून सुरु होतो, गायतोंडेंना रंग महत्वाचा वाटतो. ते रंग ऐकत असतात. त्यांचा तो अद्भत हिरव्या रंगाचा स्वत:ला शोधत जाणारा कॅनव्हासवरचा प्रवास, मिथ्यांना चित्रात परावर्तित करणारे बरवे, कोलते चित्रकलेचा संबंध अगोचर सृष्टीच्या अशोधाशी लावतात.
खरं तर प्रत्येक पेंटींग हा एक अपरंपार शक्यतांचा प्रवास असतो.. रंगाकडे, कॅनव्हासकडे आणि शेवटी स्वत:कडे.
चित्र बघण्याकरता मनात उमज हवी ती फ़क्त याचीच.
चित्र आवडलं की चित्रकाराचा शोध घेणं, चित्रांमागची कहाणी जाणून घेणं अपरिहार्य ठरतं. व्हॅन गॉघचं कानावर रुमाल बांधलेलं सेल्फ़ पोर्टेट बघताना त्या रुमालामागच्या तुटक्या कानाची गोष्ट जाणून घेणं अपरिहार्य असतं, गायतोंडेंचं जगाकडे पाठ करुन एकांतात जगणं आणि हुसेनचं माणसांच्या सतत गर्दीत राहून एकाकी असणं, अमृता शेरगिलचं मनस्वीपण..
प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी.वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीमागच्या प्रेरणेची कहाणी.दोन्हीही एकच कदाचित.चित्रकला म्हणजे नक्की काय?
चित्रकला म्हणजे गायतोंडेंची कित्येक कोटींना विकली गेलेली पेंटिंग्ज?की दिल्लीत निजामगंजच्या बरसातीत अखेरच्या एकाकी दिवसांत त्यांनी चितारलेली सिलिंगफॅनची तीन पाती?हुसेनचे करोडोंचे घोडे? की त्याला परागंदा करणार्‍या नग्न देवतांचे कॅनव्हास?रवि वर्माची धनिकांच्या खाजगी संग्रहात बंदिस्त झालेली दमयंती? की त्याच्या सरस्वतीच्या चित्रामागचा गूढ चेहरा?भास्कर कुलकर्णींनी जगासमोर आणलेली वारली आर्ट आणि मधुबनी? की त्याच मधुबनी गावामधे त्यांचे उपेक्षेत मरुन जाणे?चित्रकला म्हणजे चिमुलकरांच्या तरल स्व्प्नांतून उमटलेले गूढ आकार बहुतेक. किंवा त्या तरल आभासी आकारांनी वेडे झालेलेचिमुलकर स्वतःसुद्धा.जेजेचं १५० वर्षं पुराणं सौंदर्य आणि आता त्याला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी.चित्रकलेची ही सुद्धा एक कहाणी आहे.
चित्रकला याही पेक्षा काही वेगळी असू शकते?आणि मग अजिंठ्याच्या पद्मपाणीने सांगितलेली चित्रकलेची कहाणी? अल्टामिराच्या त्या तीन उन्मत्त बैलांनीही चित्रकलेचा अर्थसांगितलेला असणारच.भीमबेटकाच्या गुहेतल्या भिंतीवरच्या आदिम आकृत्यांमधली उर्जा.. आदिवासींचा जीवनमरणाचा संघर्ष उलगडवून दाखवणारीतीही चित्रकलाच. चित्रकला ही मानवतेची भाषा आहे, मानवतेची लिपी आहे.
चित्रकार रोज एक पेंटींग करत असतोच कुठे ना कुठेतरी.
ज्या प्रत्येक पेंटींगमागे एक कहाणी असते ती जाणून घेणं महत्वाचं. पेंटींग म्हणजे रंगाकारापलीकडला एक नि:शब्द अवकाश. मौनाची भाषा उलगडणारी चित्रलिपी शिकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे चित्रकाराचा, त्याच्या चित्रकलेचा सन्मान करणं.
पेंटिंग जिवंत बनतं ते या कहाणीमुळे.
ती जाणून घेतली नाही तर कदाचित कॅनव्हासवर फ़क्त रंग उरतात, रेषा उरतात, आकार उरतात. रंग कोणते, कसे वापरलेत, रेषांचे फ़टकारे किती जोमदार, लय किती नाजूक, आकार किती सघन हे कदाचित समजावून घेता येऊही शकतं, पण त्यामुळे चित्र उमजेलच, आतपर्यंत पोचेलच असं नाही. तुमचा त्या चित्राशी संवाद होईलच असं नाही.क्यूबिझम, फ़्यूचरिझम, दादाइझम, फ़ॉव्हीझम, एक्स्प्रेशनिझम.. हजारो इझम, असंख्य वाद.. नक्की कोणत्या कप्प्यात चित्राला बसवायचं असा मेंदू थकवणारा विचार करुन चित्र समजू शकते?
चित्रकला म्हणजे जीवनकहाण्या, निर्मितीप्रेरणेचा वेध, ध्यासामागची, जगण्याशी चाललेल्या झगड्याचीही कथा..अजूनही बरंचकाही.. रोजच्या, आजूबाजूच्या आयुष्यातलं.. चित्रकलेचा पसारा तर आपलं अवघं जगणंच व्यापून बसलेला आहे.
हे जर उमगलं नाही तर- हे घोडे काय, आमचा पाचवीतला मुलगाही काढेल, हे काय नुसते रंग फ़ासलेत, नुसताच ठिपका दिलाय, उलटं लावलं तरी कळणार नाही असं दिस्तय हे चित्रं." किंवा "चित्रकलेशी आमचा काहीच संबंध नाही,चित्राबित्रांमधलं आम्हाला काही कळत नाही" हे उगीचंच तुच्छतेनं, ठासून सांगीतलं जातं.
आपल्याकडे चित्रभाषा जनसामान्यांपर्यंत कधी पोचलीच नाही. चित्राच्या विषयापेक्षा त्याच्या किंमतीची, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले चित्रांचे लिलाव याबद्दलची चर्चा जास्त होते.
शेवटी चांगलं चित्र म्हणजे नेमकं काय? पाहणा-याचा चित्राशी संवाद सुरु होऊन पाहणारा तिथेच खिळतो, ती त्याला चित्राची भाषा कळण्याची, चित्र उमजण्याची सुरुवात असू शकते.
रविन्द्रनाथ ठाकूर म्हणाले होते- चित्रकार गात नाही, धर्मकथा सांगत नाही. चित्रकाराचे चित्र बोलते. एक कहाणी सांगते.
ऐकूया आपण ही चित्रभाषा.

No comments: